“उद्रेक तर होणारच” …!

आदरणीय प्रिय पंतप्रधान मोदीजी ,
काय लिहू तुमच्याबद्दल, वरील आदरणीय अणि प्रिय लिहताना तिथे एक शिवी लिहू वाटत होती, पण काय करणार देशाचे प्रतिनिधी म्हणुन सन्मानाच्या पदावर आपण विराजमान आहात. ज्या पदाचा अपमान करायची माझी अजिबात इच्छा नाही. पण हा लेख लिहिण्या मागचे कारण आहे आज 2 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथील शेतकऱ्यांना तुम्ही दिलेल्या वागणुकीबद्दल

2014 च्या निवडणुकीत मोठ्या ताठ मानेने तुमचा प्राचार करताना माहीत नव्हत तुमच सरकार इतके उलट्या काळजाचे निघेल. मतदानाचा अधिकार नव्हता तरी फक्त देशात सकारात्मक बदल घडतील अशी अपेक्षा ठेऊन मी आपला अणि आपल्या पक्षाचा प्रचार केला एवढच नव्हे माझ्यासारख्या अनेक तरुणांनी आपला प्रचार केला. इतका उद्रेक झाला त्यावेळी की आपण स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नंतर इतक्या वर्षांत बहुमतात सरकार स्थापण्याचे भाग्य मिळवले. लोकांना खूप आश्वासने दिलीत आपण, त्याबद्दल काही आक्षेप नाही. पूर्ण देखील करू शकला नाहीत तरीही एवढे वाईट नाही वाटले, पण आज मात्र वाईट वाटतय. वाईट एवढ्यासाठी वाटतय की ज्या शेतकरी वर्गाने आपल्याला भरभरून प्रतिसाद दिला त्यांना आपण काहीच दिले नाही. अणि जेव्हा त्यांनी शांततेत मोर्चा काढला तर आपन दिल्लीत शेतकर्यांना प्रवेश नाकारला, का हो ते मोर्चेकरी शेतकरी देखील नक्षलवादी वाटले होते का?
अणि तरीही शेतकर्‍यांनी विरोध केला तर त्या निष्पाप शेतकर्‍यांना आपण पोलिसांच्या मार्फत लाठीचार्ज केलात, त्यांच्यावर अश्रूधुराचे नळकांडे सोडले. पाण्याचा मारा करून त्यांना माघार घ्यायला लावली. असंख्य शेतकर्यांना रक्तबंबाळ केले. आजवर एवढे राज्यकर्ते आले पण आपल्या इतका हुकुमशाही प्रवृत्तीचा पंतप्रधान देशाला भेटला हे या देशाचे दुर्भाग्य.

आज माझ्यासारख्या असंख्य तरुणाना अणि जनतेला या घटनेबद्दल चीड येते संताप येतो पण तुम्हाला त्याच्याही काहीच कर्तव्य राहिले नाही. कारण तुम्ही आता सगळी यंत्रणा काबीज केलीये ना. सगळ्या महत्त्वाच्या पदावर आपले विश्वासू शिलेदार बसवून आपल्याला हवी तशी देशाची वाट लाऊ शकता आपण.
आज ज्या शेतकरी बांधवांनी मोर्चा काढलेला ते काय सरकला खंडणी नव्हते मागत. ते त्यांच्या हक्काची लढाई लढत होते अणि तुम्ही त्यांच्यावर इतक्या क्रूरपणे पोलिसांकडून हल्ला केलात.

मोठमोठे गुजराती व्यापारी हजारो कोटींचे घोटाळे करून देश सोडून पळून गेलेले बर चालतात हो तुम्हाला. तेव्हा नाही तुम्ही दंडुकेशाही वापरत. तो मद्यसम्राट विजय मल्ल्या सांगून गेला होता तुमच्या एका मंत्र्याला की मी देशाला 15 हजार कोटींचा चुना लाऊन जातोय, पण तिथे नाहीत तुमच्या यंत्रणेचे हात जाणार. तुम्हाला दिसणार आमचा गरीब शेतकरी. अहो गेल्यात चार वर्षात गाय, जात धर्म, नेहरू, गांधी, अणि भूलथापा याशिवाय तुम्ही दिलेच काय लोकांना. आनि तुमच्या विरोधात कुणी आवाज उठवला तर त्याला तुम्ही अश्या प्रकारे जेरीस आणणार.

तुम्ही लोकशाहीच्या चौथ्या खांबाचा म्हणजेच वृत्तपत्रे अणि मीडियाचा गळा घोटला, तुम्ही “ईव्हिएम” मशीन मधे बिघाड करून निवडणुका जिंकल्या, तुम्ही संख्याबळ कमी असताना देखील सरकार स्थापन करण्याची संधी स्वतः प्रथम मिळवून लोकशाहीच्या तत्त्वाची पायमल्ली केली. देशातील लोकशाही अक्षरशः या मोदी नवाच्या हुकूमशहाच्या पायाशी लोळण घालत आहेअक्षरशः
आज आपल्या देशातील अनेक विचारवंत, लेखक, साहित्यिक, पत्रकार यांच्या मनात या सरकार बद्दल रोष आहे, पण ते जाहीरपणे व्यक्त नाहीत करू शकत. कारण आहे सरकारचे दबावतंत्र. ही अघोषित आणीबाणी आज आपल्यावर लादली गेली आहे. जर अजून देखील जनतेचा उद्रेक झाला अणि मोदींना अंदाज आला की आता आपले सरकार येऊ शकत नाही तर आणीबाणी देखील जाहीर करायला मागेपुढे पाहणार नाहीत हे महाशय.

आज अनेक लोकाना यांचे खरे रूप समजले आहे, तसेच असंख्य लोक असेही आहेत की ज्याना अजुनहि या नीच सरकार बद्दल आस्था आहे. पण बाबांनो एक गोष्ट ध्यानात घ्या “एकदा गमावलेल स्वातंत्र्य सहजासहजी परत नाही मिळत” इतिहास आठवा, एकदा इंग्रजानी आल्यावर राज्य आणले तर स्वातंत्र्य मिळवायला 150 वर्षे गेली. शिवरायांच्या काळात तर 350 वर्षे गेली. त्यामुळे हे सहज समजू नका. आज अनेक व्यापाऱ्यांना मोदी यांनी अभय दिले ज्यानी सरकार कडून घेतलेल कर्ज बुडवलेल आहे. ज्यानी कर भरला नाही. पण शेतकर्यांना त्यांच्या मागणीसाठी झुलवत ठेवले

लक्षात ठेवा मोदीजी हा देश पहिला शेतकर्‍यांचा आहे या देशाचा राजा हा शेतकरीच आहे. व्यापारी उद्योगपती नंतर,पण तुमचे पहिले प्राधान्य हे शेतकर्‍यांना असायला हवे होते. परंतु दुर्दैव आमच की आम्हाला एक आदर्श पंतप्रधान नाही तर, तुमच्यासारखा संवेदनाहीन अणि देशातील काही चार मोठ्या उद्योगपतींच्या दावणीला बांधलेला बैल पदरात पडलाय. आज अनेक मोदी भक्त त्यांच्यावर वापरलेल्या या भाषेवरून मला उत्तर द्यायला येतील पण त्यांना देखील एकच आवाहन आहे, देशाच्या इतिहासातील इतका खोटारडेपणा असलेला पंतप्रधान मला दुसरा कोणीतरी दाखवा. सतत खोटे बोलणारा हा माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर पंतप्रधान म्हणुन विराजमान आहे याच्यासारखे दुसरे दुर्दैव नाही.

माझ माझ्या सारख्या असंख्य तरुण मित्रांना मनापासून आवाहन आहे, कृपा करून या सरकार बद्दल असलेला आपला रोष व्यक्त करा. जर व्यक्त करू शकत नसाल तर दुसरा जो करत असेल त्याला पाठींबा द्या. पण या गेंड्याच्या कातडी असलेल्या निर्दयी सरकारच्या विरोधात जा. जर आज आपण हे केले नाही तर येणार्‍या पुढच्या पिढीला आपण काय तोंड दाखविणार. देशाची लागत असलेली वाट निमुटपणे पाहत असणारी पिढी म्हणुन आपली ओळख होऊ देऊ नका आपल्या पिढीची.

कृषिप्रधान देशात शेतकरी राजाला अशी अमानुष मारहाण होणार असेल तर हे लक्षण देशाच्या विनाशाचे आहे. अनेक मोदी भक्तांना देखील कळकळीची विनंती आहे, मित्रानो एखाद्या व्यक्तीबद्दलचे समर्थन मी देखील समजू शकतो. पण त्या व्यक्तीच्या प्रेमाने इतके आंधळे होऊ नका की काही काळाने, आपला देश आपणच संपवला अणि हुकुमशाही आणली या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल. इतके आंधळे नका होऊ मित्रानो. हातातून एकदा हे निसटले की परत काहीच उरणार नाही.

आज मी हा लेख लिहिला कारण मी देखील शेतकरी म्हणुन जगलोय काम केलेय. मला आस्था आहे शेतीबद्दल. आनि याच माझ्या मायबापांना जर सरकार असे हुकुमशाहीने चिरडणार असेल तर मी व्यक्त होणे माझे कर्तव्य समजतो. मित्रांनो या जुलमी सरकार विरोधात एकत्र या, व्यक्त व्हा. व्यक्त होता नाही आले तर जो व्यक्त होतोय त्याला बळ द्या. कारण तो व्यक्त होणारा कुठे ना कुठे तरी तुमच्या वाट्याची लढाई लढत असतो. काहीही करून या हुकूमशहा सरकारला विरोध करा.

मित्रानो सुरुवात जरी मोदींना पत्र लिहतोय अश्या स्वरुपात असली, तरी हा “संताप” आहे शेतकर्‍यांना मोदी सरकारने आज दिलेल्या वागणुकीबद्दलचा. मला देखील माहित आहे, माझ हे शब्द मोदी पर्यंत नाहीत पोहोचणार. पण मला विश्वास आहे माझ्या या शब्दांमुळे चार लोक तरी या नीच सरकारच्या भूल थापा मधून बाहेर येतील. अणि सत्य परिस्तिथी समजून शहाणे होतील . 2 ऑक्टोबर दिवशी जगाला अहिंसेचा संदेश देणार्‍या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी त्यांना आपण अभिवादन केलेत मोदीजी, अणि त्यानंतर काही वेळातच आपल्याच सरकारने हिंसा केली. त्याबद्दल त्यांना एकच सांगायचे आहे “मुंह मे राम और बगल मे नथुराम ही आपली वृत्ती लोकांनी ओळखली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यां कडुन तर मत मिळण्याची अपेक्षा अजिबात करू नका…..!
जय महाराष्ट्र…!
©Vitthal bhagat

Advertisements

“आरक्षण जातीवरून असाव, की आर्थिक निकषांवर” …. ???

“आरक्षण या विषयावर सत्यपरिस्थिती सांगण्यासाठी सदर लेख लिहला गेलेला आहे. मुळात आरक्षण म्हणजे काय त्याचा उपयोग काय अणि आपल्या राज्यासाठी किंबहुना देशासाठी नक्की कुठल्या आधारावर आरक्षण दिलेले योग्य ठरणार आहे याच हे विश्लेषण. संपूर्ण भूमिका मांडल्यामुळे लेख थोडा विस्तृत आहे, परंतु तितकाच महत्त्वपूर्ण देखील आहे “

आरक्षण म्हणजे काय? ते नक्की असते कशासाठी? याचा नीट अभ्यास केला तर लक्षात येते आरक्षण हे मुख्य दोन गोष्टीसाठी लागु होते. एक म्हणजे शिक्षण क्षेत्रात, दुसरे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी. अणि महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही गोष्टीसाठी आरक्षण देण्याचे कारण एकच असते की समाजातील जे वंचित दुर्लक्षित घटक आहेत त्यांची आर्थिक परिस्तिथी सुधारावी. आरक्षणाचा इतिहास पाहिला तर पुरोगामी संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्रातील छत्रपती शाहू महाराज यांनी त्यावेळी दलित समाजाला आरक्षण दिले. त्यांनाच आरक्षण दिले, कारण त्यावेळी दलित समाज खूप मागासलेला होता त्यांच्या जीवनात बदल घडावा त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिले. त्यावेळी इतर समाज देखील होते, पण त्यांच्यावर दलित समाजा इतकी भीषण परिस्तिथी नव्हती.
हा झाला आरक्षणाचा इतिहास या काळापासून आरक्षणाला सुरुवात झाली.

त्यानंतर बाबासाहेबांनी संविधान लिहले दलितांना अणि इतर समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कायद्याने आरक्षण दिले. आज देश स्वतंत्र होऊन संविधान अस्तित्वात येऊन सत्तर वर्षे लोटली. त्यावेळची सामाजिक परिस्थिती अणि आताची सामाजिक परिस्तिथी यात खूप तफावत आहे,त्यावेळी आर्थिक दृष्टय़ा मागासलेला अणि दुर्लक्षित अशी संख्या असलेला मोठा वर्ग दलित होता. पण आत्ताची परिस्थिती पाहिली तर अस लक्षात येत की सर्वच जातींमध्ये समाजामधे आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि हे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.

आजघडीला महाराष्ट्रमधे मराठा समाज स्वताच्या हक्कासाठी रस्तावर उतरलाय. आज मराठा समाजातील बहुसंख्य कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मागासलेली आहेत त्यांना आरक्षणाची खरच गरज आहे.
पण आपण आज मराठा आरक्षणासाठी मागणी करतोय. बर समजा भेटले मराठा समाजाला आरक्षण मग पुढे काय? उद्या धनगर समाजाचा प्रश्न आहेच, आदिवासी समाज आहेच इतर अजून जातीतील लोक आरक्षणाची मागणी करतील, त्यांच काय..? अस प्रत्येक समाज एकापाठोपाठ एक आरक्षणाची मागणी करत राहिला तर राज्यात शांतता राहिल का? सतत आंदोलने होतील की, आज यांच झाल उद्या त्यांच असेल. यातून निष्पन्न काय होणार आहे? आणि ज्या जातीनां आरक्षण नाही पण त्यांच्यात आर्थिकदृष्टय़ा मागासलेले लोक आहेत त्यांच काय? म्हणुन जर आरक्षणाचा लाभ खरच दुर्बल घटकांना द्यायचा असेल तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण काळाची गरज आहे.

आपण समजून घेतले पाहिजे की आपली मुख्य गरज आहे आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण. जातीवर आधारित आरक्षण हे फक्त समाजामधे तेढ निर्माण करण्याचे काम करणार आहे. आज प्रत्येक समाजात आर्थिकदृष्टय़ा मागासलेले लोक आहेत.
आनि अश्या वेळी जातीवर आधारित आरक्षण दिले तर आरक्षण लागु असलेल्या, पण आर्थिकदृष्ट्या सुदृढ असणाऱ्या वर्गाला पण याचा फायदा होईल,पण ज्यांना खरच गरज आहे पण त्यांची जात आरक्षणाच्या कायद्यात नाही अशे गरजू वंचित राहतील. पण आर्थिक निकषांवर आरक्षण दिले तर मुळात आरक्षण ज्या कारणासाठी दिले जाते ते कारण यशस्वी होईल. जर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण आले तर जात नावाची गोष्टच हद्दपार होईल. आज जातीवर आरक्षण आहे म्हणुन जाती माहीत आहेत, अरे हा दलित आहे म्हणुन याला आरक्षण आहे हा माळी आहे म्हणुन याला आरक्षण आहे पण जर जातीवर आधारित आरक्षणच नसेल तर कशाला कोण विचारेल कुणाची जात? पण हे सगळे आपल्या राज्यकर्त्यांना माहीत असूनही ते यावर काहीच निर्णय घेत नाहीत कारण त्यांचे जातीच्या नावावरुन मत मिळविण्याचे धंदे बंद होतील.

आज प्रत्येक समाज एक एक करून आरक्षण मागतोय त्यापेक्षा सर्व समाजातील घटकांनी एकत्र येऊन आर्थिक निकषांवर आरक्षण मागितले तर त्याचा फायदा सर्वच समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना होईल. आनि खर्या अर्थाने आरक्षण ज्या उद्देशासाठी असते तो उद्देश पूर्ण होईल. आज आपल्या राज्यात नोकर्‍या उपलब्ध आहेत, कायदा असा आहे की जिथे रोजगाराची संधी उपलब्ध असेल तिथल्या भूमिपुत्रांना 80%रोजगार दिला गेला पाहिजे. पण आपले राज्यकर्ते याची अंमलबजावणी करत नाहीत.बाहेरील लोक येऊन आपला रोजगार घेऊन जात आहेत अणि आपण जातीवरून आरक्षण मागत बसलोय. जर ह्या आपल्या हक्काच्या नोकरीच्या संधी जर आपल्याला उपलब्ध झाल्या तर आरक्षणाची गरज भासेल काय? अणि त्यातूनही जर आरक्षण मिळवायचे असेल तर ते आर्थिक निकषांवर दिल्यावर सगळेच गरीब लोक त्याचा लाभ घेऊ शकतील.

मला वाटते आपणच आपल्या भूमिकेत बदल करणे गरजचे आहे. ज्या महाराष्ट्राने देशाला पुरोगामी विचार दिले, त्याच महाराष्ट्राने आज पुन्हा एकदा एकत्र येऊन प्रबोधन करण्याची वेळ आली आहे. छत्रपति शाहू महाराजांनी जातीवाद नष्ट करण्यासाठी आंतरजातीय विवाह पद्धती चालू केली अणि स्वताच्या घरातून या कार्याला सुरुवात केली. जर हा लोकराजा जातीयवाद संपवण्यासाठी इतके मोठे निर्णय घेऊ शकतो तर आपण एक समाज म्हणुन जातपात बघून आरक्षण मागणे बंद करू शकत नाही का? आपली ओळख जातीवरून नाही भाषेवरून असली पाहिजे,
आपण महाराष्ट्रीयन आहे ना? मराठी भाषिक आहे ना?. मग आपण कुठल्याही जातीचे धर्माचे असोत, आपण मराठीच आहे. आपली अस्मिता मराठी आहे आपला बाणा मराठी आहे. कारण आपली भाषा मराठी आहे. जर आपण सर्व मराठी भाषिक म्हणुन एकत्र राहिलो तर सर्वांचीच प्रगती होईल…!

जय महाराष्ट्र…!!!

वरील विश्लेषण वाचल्यावर आपली प्रतिक्रिया नक्की द्या तुम्हाला काय वाटतय, आरक्षण जातीवर आधारित असायला पाहिजे की आर्थिक निकषांवर आधारित.?

‘शहीद’ म्हणायचे, की ‘बळी’?

“आपल्या देशातील संरक्षण सिद्धता जगद्विख्यात आहे. आपल्या देशातील सैन्याच्या पराक्रमाबद्दल कुणालाही तिळमात्र शंका नसावी. तरीही आपले जवान पाकिस्तान सारख्या अप्रगत अणि आपल्यासमोर एकही युद्ध लढायची लायकी नसलेल्या राष्ट्राकडून जीव गमवत आहेत . सरकार बदलत गेली पण सीमेवरील परिस्तिथी जैसे थे आहे. प्रत्येक वेळी सत्तेत येणार्‍या लोकांनी अणि विरोधकांनी लोकांना भावनिक बनवण्यासाठी सैन्याच्या नावाचा वापर केला त्यांचा कळवळा आहे अस दाखवले. पण त्यांच्या बद्दल चित्र बदलले नाही. आपले सैनिक नक्की शहीद होताहेत का ते आपल्या दुबळ्या राजकारणाचे बळी ठरताहेत यासाठी हे विश्लेषण…!”

जगातील सगळ्यात मोठे सैन्यबळ असलेला दुसर्‍या क्रमांकाचा देश आपला भारत. आपला देश अण्वस्त्रधारी देश. ब्रम्होस, अग्नी सारख्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आपला देश. आपल्या देशातील सैन्यबळ किती आहे माहितीय?, 12 लाख 37 हजार 200 म्हणजे आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रत्येकी हजार लोकांमागे एक जवान. म्हणजे आपल्या सैन्यातील एक जवान शहीद झाला तर आपल्यातील 1 हजार लोक असुरक्षित झाल्यासारखे आहे. आणि याचा आपण गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

लहानपणापासून वृत्तपत्रात वाचण करेल तेव्हा बहुतांशी वेळा एक बातमी असायचीच, ती म्हणजे इकडे दहशतवादी हल्ल्यात 4 जवान शहीद 2 जवान शहीद. पाकिस्तानने सीजफायर उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात काही जवान शहीद. हे आपल्याला नित्याचेच झाले आहे. आम्हाला याबद्दल काही वाटेनासेच झालय. जवान मारताहेत ना मरूदेत. आम्हाला काय फरक पडतोय. आम्ही तयार आहोत पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट पाहण्यास. आमची मानसिकता तेव्हा समजते जेव्हा सुट्टीवर चाललेला जवान ट्रेन मधे असतो अणि त्याला आदरपूर्वक कोण बसायला जागा देत नाही. उभा राहून प्रवास करावा लागतो. ज्यांच्या जिवावर देश सुरक्षित राहिलाय त्यांना आम्ही असली विचित्र वागणूक देणार. जवानांचा आदर करणारे पण खूप असतिल पण त्याचे प्रमाण किती.

आमच्या राज्यकर्त्यांबद्दल तर या बाबत बोलायलाच नको. आजवर इतके पक्ष सैन्याप्रति मोठा कळवळा असल्यासारखे दाखवून सत्तेत आले, पण काय उपयोग झाला. अरे एक युद्ध आपल्यासोबत करायची लायकी नसलेला पाकिस्तान देश आमचे सैनिक गोळीबार करून मारतोय. आनि आमचे प्रधानमंत्री नियोजित नसताना पाकिस्तानला जाऊन तिथल्या पंतप्रधानांना केक भरवून येताहेत. हे आहे आमचे दुबळे परराष्ट्र धोरण. आमच्याकडे बुलेट ट्रेन आणायला पैसे आहेत पण सैनिकांना बुलेटप्रूफ जॅकेट द्यायला पैसे नाहीत. अणि एकदा दिली ती पण निकृष्ठ दर्जाची जॅकेट दिली. ही अवस्था आहे आपल्या जवानांची. आम्हाला सांगितले जाते, पाकिस्तान मधून आपल्या देशाला इंधन पुरवठा होणारी पाइपलाइन येते म्हणुन आपल्याला त्यांच्यासोबत नरम भूमिका घ्यावी लागतेय. अरे आपला इतिहास काय? आपल्याला अमेरिकेने महासंगणक द्यायला नकार दिल्यानंतर आपण स्वतः महासंगणक विकसित केला अणि जगाला आपल्या ताकदीची जाणीव करून दिली.

आम्ही जगाकडुन काय घ्यायला पाहिजे अणि काय घेताहोत. आम्ही इस्रायल कडून शस्त्रास्त्रे विकत घेतली पण त्यांची त्यांच्या सैन्याबद्दलची किंबहुना प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेबद्दलची आदर्श भूमिका आत्मसात केली नाही. ते जसे त्यांचा सुरक्षेशी कडवट असतात तसे आम्ही नाहीआहोत. इस्रायलच्या एखाद्या सैनिकाला मारले तर त्या मारणाऱ्याचे संपूर्ण पाळेमुळे उध्वस्त केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. आम्ही त्यांच्याकडून शस्त्रे खरेदी केलीत पण माझे एक स्नेही आहेत सैन्याच्या BSF शाखेत. त्यांनी सांगताना असे सांगितले की आम्हाला आत्ता दिले गेलेले इस्राइलचे रायफल निकृष्ट दर्जाचे आहेत. मागे एकदा काही सैनिकांनी वीडिओ द्वारे त्यांची जेवणाबद्दल होत असलेल्या हेळसांडची व्यथा मांडली होती. हे असले हाल चालले असताना सुद्धा देशसेवा करणार्‍या त्या सैनिकांचे आपण किती ऋणी असायला पाहिजे? पण आम्हाला याबद्दल काहीच वाटत नाही, आम्ही आमच्याच आयुष्यात मश्गुल.

आमच्या राज्यकर्त्यांनी तर क्रौर्याची सीमा ओलांडली आहे, मागील सरकार कमी की काय तोवर नवीन घोटाळ्याची चर्चा चालू. आपल्या सैन्यासाठी फ्रांस कडून राफेल लढाऊ विमाने विकत घेतली जात आहेत. आपल्या आधी ‘कतार’ नवाच्या राष्ट्राने हीच विमाने प्रत्येकी 1390 करोड रुपये देऊन खरेदी केली असताना आपण ती 1670 करोड रुपयांना खरेदी करत आहोत, मग हा घोटाळा नाही का? देशाच्या सुरक्षेच्या धोरणात पण घोटाळे होणार असतिल,तर काय उपयोग जवान सीमेवर तैनात करून. हे राज्यकर्ते पुरेसे आहेत देश आतून पोखरून काढायला. आम्हाला या गोष्टीबद्दल राग येत नाही,
आम्ही याचा निषेध व्यक्त करत नाही, आम्ही सैन्यासाठी एखादे आंदोलन उभे करत नाही. सैन्याने एखाद्या दिवशी सगळे सोडून आंदोलन केले तर चालेल का आपल्याला…? राहील का आपला देश?

ऐन तारुण्याचा भरात असताना आमचे जवान देशसेवेसाठी सीमेवर जाऊन लढतात. त्यांना पण कुटुंब असते. शहीद झाल्यानंतर आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहतो अणि रिकामे होतो. पण त्यांच्या जाण्याचे दुःख कुटुंबाला भोगायचे असते. त्यांना काही पैश्यांची मदत देऊन त्याचे दुःख कमी होते काय? आणि मग या सर्व गोष्टी पाहता मला एक साधा अणि गंभीर प्रश्ण पडतो तो म्हणजे,

“आपले सैन्यातील जवान खरच “शहीद” आहेत का तुमच्या आमच्या निष्काळजीपणाचे किंबहुना सरकारच्या चुकीच्या परराष्ट्र धोरण, चुकीचे आंतराष्ट्रीय राजकिय धोरण अणि देशांतर्गत राजकारणाचे “बळी”?
तुम्हाला येत असलेले उत्तर तुम्हीच द्या…!

“हा खेळ भावनांचा”

“भारतीय जनमानसात भावनेला खूप महत्व आहे,अणि हे चांगले आहे पण याच भावनिक स्वभावाचा अतिरेक झाला की घडते सामाजिक अस्थैर्य. त्यामुळे आपण आपल्या गरजा ओळखण्यात अपयशी ठरतो आनि आपला विकासात्मक दृष्टिकोण विसरून जातो “

आजच्या आपल्या भारतीय समाज व्यवस्थेवर दृष्टिक्षेप टाकल्यास एक गोष्ट पटकन लक्षात येते. आपले भारतीय लोक मुळात खूप भावनिक. देशातील कोणतेही क्षेत्र घ्या मग ते धार्मिक, सामाजिक असो राजकिय असो सांस्कृतिक वा कला क्षेत्र असो पण, भावना महत्वाची…!

आता एक उदाहरण पाहू मध्यंतरी ‘पद्मावत’ याचित्रपटावरून देशभरात माजलेला कल्लोळ, कारण होत एका समाजाच्या भावना दुखावल्याचे. कदाचित भावना दुखावण्यासारखे काही असेलही त्या चित्रपटात. पण त्यावेळी इतके मोठे आंदोलन झाले की त्या चित्रपट निर्मात्याला चित्रपटाच्या नावात बदल करावा लागला.

आज पाहायला गेल तर लक्षात येईल, आपले लोक किती भावनिक आहेत. एखाद्याबद्दल आपल्या मनात त्याचे स्थान कसे ठरवतात. मध्यंतरी गुजरात च्या निवडणुका पार पडल्या.

साधारणतः निवडणुकीत मुद्दे विकासाबद्दल असायला हवेत ना?,पण गुजरातच्या निवडणुकीत हार्दिक पटेल नवाच्या एका नेत्याची अश्लील वीडियो जाहीर सभेत वायरल केली गेली. सांगायचा उद्देश एकच आहे की आपण लोक आपल्या गरजा काय आहेत हेच विसरून गेलोय. समोरचा कसा आहे यापेक्षा तो राजकारणाच्या, सत्तेच्या माध्यमातून जनतेला काय देऊ शकतो याला आपण जेव्हढे महत्व द्यायला पाहिजे तेवढे देत नाही आहोत.

आपण आपल्या गरजा ओळखायला शिकले पाहिजे, मागे कर्नाटक निवडणूकीत मोदींनी नेहरू बद्दल विषय उकरून काढले. आता कर्नाटक निवडणूक आणि नेहरू यांचा काय संबंध, पण गेल्या चार वर्षांत दाखवन्यासारखी कामे नाहीत म्हणुन त्यांना हे असले भावनिक खेळ खेळावे लागले. आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी हेच भावनिक खेळ खेळलेत जनतेशी. मधेच कुठल्या तरी विशिष्ट जाती धर्मावर टीका करून लोकांच्या भावना भडकवायच्या. देशप्रेमाच्या नावाखाली राजकीय भांडवल करायचे. ही या ‘राज्यकर्त्यांची’ हिम्मत होते कारण त्यांना आपण प्रोत्साहन देत आलोय.

जर आपण आपल्या दैनंदिन गरजा सोडवू शकणार्‍या राज्यकर्त्यांची निवड करणार असू, तर आपण राज्यकर्ते निवडताना भावनिक होता कामा नये. आपल्या गरजा काय आहेत आनि राज्यकर्ते आम्हाला काय देताहेत किंबहुना त्यांच्या भाषणांतून त्यांच्या वागण्यातून ते आपल्यासाठी काय करू शकतात हे समजून घेतले पाहिजे. आणि जे आपल्याला भावनिक बनवुन मत मिळवतात त्यांना बाजूला केले पाहिजे. तरच आपल्या देशात राजकिय आनि सामाजिक उत्कर्ष होईल आनि देश विकासाकडे मार्गस्थ होईल.

आपल्याला कोणी जातीवरून भावनिक करते कोणी धर्मावरून भावनिक करते. स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे लोटली तरी आम्ही अजून मूलभूत गरजा च्या पुढे जाऊन विचार करू शकलो नाही, याचे कारण आहे आपन प्रत्येक वेळी भावनिक होऊन राज्यकर्ते निवडले. हा लेख लिहण्या मागचे कारण एवढेच आहे, की हे राज्यकर्ते आपल्या भावनेचा आधार घेऊन आपल्या मनात स्थान बनवतात आनि निवडून येतात. “उद्या जर आपण भावनिक न होता राज्यकर्ते निवडायला लागलो तर राज्यकर्त्यांना पण त्यांची पद्धत बदलून लोकांना भावनिक न करता लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीचा दृष्टिकोन आत्मसात करावा लागेल”. आणि त्याचवेळी भारत पूर्ण क्षमतेने समृद्ध आनि मूलभूत गरजांच्या पलीकडे जाऊन विकास करू शकेल.

“शेतकरी संप”

“आजकाल पाहतोय, एक ट्रेंड झालाय शेतकरी संप करायला लागले की त्यांच्यावर टीका करायची. शेतकर्‍यांनी दूध आनि भाज्यां रस्त्यावर फेकला म्हणुन शेतकर्यांना सल्ले देण्याचा, त्यांच्यासाठीच हा लेख.”

शेतकरी संपावर जातो, शेतकरी रस्त्यावर भाजी, फळे, कांदे, दूध ओतून सरकार ने त्यांच्यावर केलेल्या अन्यायाचा निषेध करतो, हे पाहताना वाईट वाटत. इतकी वर्षे झाले शेतकरी आपल्या मागण्या घेऊन झगडतो आहे तेव्हा कधी कुणाला दिसले नाहीत शेतकरी. इतके वर्षे झाल शेतकरी आपल्या रास्त मागण्यासाठी आंदोलने करतोय पण त्याच्यावर कुणी बोलायला तयार नाहीत. इतक्या कष्टाने पिकवलेला शेतमाल रस्तावर फेकताना शेतकर्‍याला काय आनंद होत नाही, त्यालाही हे तितकाच वेदना देणार आहे. पण याला इलाज नाही, सर्व शेतकरी वर्गाच्या हितासाठी थोडे कठोर होन गरजेच आहे.
अनेक राजकारण्यांनी शेतकर्‍यांच्या नावाने आपली राजकिय पोळी भाजली, पण शेतकर्‍यांना न्याय नाही दिला.
आज शेतकरी देशभरात आंदोलन करत आहेत. रस्त्यावर सगळा शेतमाल फेकत आहेत दूध फेकत आहेत,त्याच्या मागचे कारण आहे शहरातील लोकांपर्यंत ते पोहोचू नये. नाक दाबल्या शिवाय तोंड उघडत नाही त्याप्रमाणे मूळ हेतू फक्त एवढाच आहे की लोकांपर्यंत शेतमाल पोहोचू द्यायचा नाही, जेव्हा सगळ्यांची गैरसोय होईल ना तेव्हा सरकार ला समजेल शेतकर्‍यांची आनि त्यांच्या शेतमालाची किम्मत.
अहो गोठ्यातल्या शेळीसाठी पण धान्य ठेवणारे शेतकरी असतात, आनि त्यांना काही लोक दानधर्म शिकवत आहेत.आनि तसही जेव्हा शेतकर्‍यांच्या पिकाला भाव नसतो. जेव्हा भाजीपाला फेकून द्यावा लागतो तेव्हा कुठे जाते तुमच्यातील माणुसकी?

शेतकरी एकवेळ स्वताच्या मुलाबाळांना कपडे घेत नाही, पण शेतातील पिकाला सगळे वेळेवर करतो. आनि एवढ करून पण जर त्याच्या पिकाला भाव मिळत नसेल, तर त्याने काय करायला पाहिजे?
माझा शेतकरी संपाला पूर्ण पाठींबा आहे.

शेतकर्‍यांनी अन्नाची नासधूस केली त्याचे समर्थन तुम्ही करता का अस मला कोणी विचारल, तर माझ उत्तर हो असेल.हो मी करतो त्यांचे समर्थन. एवढ्या हालअपेष्टा सहन करून त्यांनी पीक जगवायचे आनि त्याला जर भाव मिळत नसेल तर त्यांनी असेच केले पाहिजे, का फुकट द्यायच कष्टाने पिकलेले? आज एवढा खर्च करून शेतकरी कांद्याचे उत्पन्न घेत आहेत, काय अवस्था आहे त्यांची?.जोपर्यंत सरकार शेतकर्‍यांच्या रास्त मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत ही अश्याप्रकारची आंदोलने होतच राहणार. शेतकर्यांना कुणी शिकवायची गरज नाही अनाथ आश्रमात दान करण्याची, ती शिकवण त्यांना जन्मजात असते. दारात आलेल्या कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकल्याशिवाय परत न पाठवण्याची संस्कृती आहे शेतकर्‍यांची, त्यांना काय दानधर्म शिकवणार बाकीचे.

शेतकरी बांधवांना ताकाला जाऊन भांडे लपवायची सवय नाही जे आहे ते स्पष्ट आहे रास्त आहे. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही त्याप्रमाणे ‘शेतमाल, अन्नधान्य, दूध’ ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत तेव्हा लोकाना शेतकर्‍यांची त्यांच्या शेतमालाची समजेल किम्मत आणि सरकार ला ही लोकांच्या गैरसोईमूळे शेतकर्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतील.
-vitthal Bhagat

जय महाराष्ट्र….!!!